| | | | | |

आमचा संपर्क क्रमांक

(०२२) २६५९२७०७

आमचा हेल्पलाइन क्रमांक

१५५२०९

Home / Initiatives

राज्य महिला आयोगाच्यावतीने नारी वारीशक्तीची उपक्रमाचे उदघाटन


पुणे, २७ जून: वारीमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग लक्षात घेता महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वारी नारीशक्तीची उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले . या कार्यक्रमांतर्गत या वर्षी महिला सक्षमीकरणाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. वारीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य महिला आयोग यंदा पालखी सोहळ्यामध्ये चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी सामील करणार आहे. या चित्ररथाचा आणि दिंडीचा शुभारंभ शनिवारवाडा,पुणे येथुंन गुरुवारी करण्यात आला.


या शुभारंभ प्रसंगी आमदार आणि विधानसभेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, संत साहित्याचे अभ्यासक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महिला आयोगाच्या सदस्य सचिव मंजुषा मोळवणे, माजी सदस्य वृंदा किर्तीकर, योगेश गोगावले, राधाबाई सोकासे उपस्थित होते.


याप्रसंगी प्रमुख पाहुण्या आमदार आणि नवनिर्वाचित विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे याप्रसंगी बोलताना म्हणाल्या, पुणे शहराची प्रबोधनाची परंपरा लक्षात घेता महिला आयोगाने दिंडीची सुरुवात पुण्यात करून एक चांगला पायंडा पाडला आहे. महिलांविषयीच्या प्रबोधनाचे काम हे केवळ महिला आयोगाचे नसून ते प्रत्येक नागरिकाचे आहे. आणि प्रत्येकाने ते केले पाहिजे. त्यामुळेच ऑनर किलिंग, जातपंचायतीचे बहिष्कार, लहान मुलींवर होणारे अत्याचार यांसारखे प्रकार अजूनही घडताना दिसतात. त्यामुळे महिलांसंबंधी प्रबोधनाच्या कार्यात स्री- पुरुष असे दोघांनी सहभागी होणे गरजेचे आहे.


याप्रसंगी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर म्हणाल्या कि, महिलांसंबंधी अनेक कायदे आणि योजना आहेत ज्यांची माहिती सहसा महिलांचं नसते, या योजना महिलांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही या उपक्रमाअंतर्गत करणार आहोत. या योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाचा कणा असलेली महिला नक्कीच आत्मनिर्भर आणि सबळ होऊ शकेल आणि त्यांचे समाजातील स्थान उंचावेल. अशाप्रकारे आम्ही आमचे महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेऊन ही महिला सक्षमीकरणाच्या आणि सबलीकरणाच्या वारीमध्ये सहभागी झालो आहोत.


पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी सुद्धा कार्यक्रमास हजर राहून महिला आयोगाच्या या उपक्रमास त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा देऊन महिला आयोगाचे कौतुक केले. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकारामांचे वंशज डॉ. सदानंद मोरे याप्रसंगी बोलताना म्हणाले कि, या उपक्रमाकरिता मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे मनापासून धन्यवाद देतो कि त्यांनी या यानिमित्ताने आयोगाला महाराष्ट्राच्या महत्वाच्या परंपरेशी जोडून घेतले.


शनिवारवाड्यामध्ये चित्ररथाचे लोकार्पण झाल्यानंतर तेथून भिडेवाड्यापर्यंत (जिथे क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांनी मुलींची देशातील पहिली शाळा सुरू केली) दिंडी काढण्यात आली. यामध्ये या मान्यवरांसोबत महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.

u-1
u-2
u-3

u-4